महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत “हरित शिवरस्ता” उपक्रम — सोनारी - मालदाभाडी रस्त्यावर दुतर्फा वृक्षारोपण!
जन क्रांती लाईव्ह न्यूज
जामनेर तालुका महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत सोनारी - मालदाभाडी शिवरस्त्यावर दुतर्फा वृक्ष लागवड मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली.
या उपक्रमामागील उद्देश शिवरस्त्याच्या अधिकृत हद्दीत कोणतेही अतिक्रमण होऊ नये आणि पर्यावरणपूरक व हरित ग्रामविकासास चालना देणे हा होता. यासाठी मोजणी विभागाने निश्चित केलेल्या सीमारेषेनुसार रस्ता हद्द निश्चित करून, त्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रेरणादायी उपक्रमात मंडळ अधिकारी मालदाभाडी, ग्राम महसूल अधिकारी मालदाभाडी, सोनारी व वाघारी, सोनारी व मालदाभाडी येथील सरपंच, पोलीस पाटील, तसेच ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले.
कार्यक्रमात शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. “झाडे लावा, झाडे जगवा”, “शिवरस्त्याला हरित कवच” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या उपक्रमाच्या माध्यमातून महसूल विभागाने एक नवा पायंडा पाडत, शासनाच्या महसूल रस्त्यांच्या जतनासोबतच हरित विकासाचा नवा मार्ग निर्माण केला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत वृक्षांची देखभाल व संरक्षणाची जबाबदारीही स्वीकारण्यात आली आहे.
⸻
“हरित शिवरस्ता – सुरक्षित व सुंदर ग्रामविकासाचा पाया!”