आदिवासी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार!यावल प्रकल्पातील सर्व शाळा ११ ते ०५भरणार...।
मुख्य संपादक/ शांताराम झाल्टे
गेल्या दीड वर्षापासून शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळांची वेळ बदलण्यात आली होती.गेल्या कार्यकाळातील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास विभाग अनुदानित कर्मचारी संघटनेकडून शाळेची वेळ बदलावी यासाठी वेळोवेळी निवेदने देण्यात आले होती.परंतु सरकार बदलले पण वेळ बदललेली नव्हती दरम्यान आताचे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांनी आपल्या पहिल्या जळगाव दौऱ्यातील दिलेले आश्वासन खरे ठरले आहे. 3 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे उपसचिव वि.फ.वसावे यांच्या सहीचे पत्र निर्गमित झाले असून,नाशिक विभागातील बऱ्याच प्रकल्प कार्यालयाने शाळेची वेळ बदलण्यासाठी कारवाई करणे सुरू केले आहे.याच धर्तीवर यावल प्रकल्पातील सर्वच शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळा यादेखील अकरा ते पाच मध्ये भरतील अशा आशयाचे निवेदन या अगोदरच दिल्याने संबंधित शाळा देखील आता नवीन वेळापत्रकानुसार भरतील अशी माहिती आदिवासी विकास विभाग अनुदानित कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजेश पाटील व जिल्हाध्यक्ष मनोजजी ठाकरे यांनी दिली आहे.यामुळे शाळा तसेच अनुषंगिक बाबींसाठी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना अध्ययन अध्यापनासाठी निश्चित असा कालावधी आणि सोयीची वेळ यापुढे मिळणार आहे. व्यायाम, झोप,जेवण,खेळ,अध्ययन यासाठी विद्यार्थ्यांना नवीन वेळ मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले असून आश्रमशाळा शिक्षकांचा देखील वेळ बदलाचा प्रश्न निकाली निघाला आहे.या कामी पाठपुरा करणाऱ्या अनेक लोकप्रतिनिधींचे आज देखील संघटनेकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.