अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...।
भाविकांसह प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल.
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे
पहूर , ता . जामनेर ( ता . ९ ) अस्तित्वात नसलेल्या जय सप्तशृंगी निवासीनी मातेच्या मंदिरासमोर शासनाच्या २५ - १५ योजनेतून सुमारे ४५ लाखांच्या सभामंडपाचे बांधकाम सुरू असून प्राचीन मंदिरांना विकासाच्या योजनांपासून डावलल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे .
वाघुर नदीच्या काठी पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारा जवळ ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक २४२ वर ८० बाय ३० आकारात भव्य सभा मंडप उभारला जात आहे . सदर सभामंडप चक्क अस्तित्वात नसलेल्या परंतु ' क ' वर्ग दर्जा प्राप्त जय सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट समोर होत आहे .
विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल राऊत आणि जय सप्तशृंगी मा ट्रस्टचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे या दोघांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत आहे . माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे भाविकांची आणि प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचे समोर येत असून शासनाच्या निधीचा गैरवापर होत आहे . पहूर कसब्यातील
महादेव मंदिर , हनुमान मंदिर विठ्ठल मंदिर ही तीन्ही मंदिरे अस्तित्वात असताना त्यांच्यासमोर सभा मंडप होत नसून अस्तित्वातच नसलेल्या जय सप्तशृंगी मातेच्या 'क ' वर्ग दर्जाप्राप्त मंदिरासमोर कसा होत आहे ? असा संतप्त सवाल भाविकांमधून विचारला जात आहे .
याप्रकरणी संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त भाविकांसह नागरिकांनी केली आहे . याच बांधकामा संदर्भात वृत्त संकलन करण्यासाठी केलेल्या पत्रकार शंकर भामेरे यांचा माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे यांनी मोबाईल हिसकावून घेतल्याची घटना घडली होती . याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे .
" पहूर कसबे येथे विठ्ठल मंदिर असून येथे कोणतेही बांधकाम सध्या सुरू नाही . "
हभप विठ्ठल राऊत
अध्यक्ष , श्री समर्थ विठ्ठल मंदिर ट्रस्ट , पहूर कसबे .
" पर्यटन विभागातर्फे विठ्ठल मंदिरासाठी बांधकाम सुरू आहे .
आम्ही गावाचा विकास करत आहोत . चार प्रश्न कोणी विचारू नये . "
बाबुराव घोंगडे
अध्यक्ष , जय सप्तशृंगी माता निवासिनी ट्रस्ट पहूर - कसबे .
" सदर सभामंडपाचे काम
ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक २४२ वर होत आहे.
शंकर जाधव ,
माजी सरपंच , ग्रामपंचायत पहूर - कसबे
Comments
Post a Comment